चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावागावांत शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चिखली तालुक्यातील इसरूळ येथे जलजीवन मिशनअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आणि बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी केला आहे. या कामाची पोलखोल करण्यासाठी त्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन हातोड्याच्या साहाय्याने बांधकामाची पाहणी केली. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
हातोडा मारताच कामाच्या दर्जावर सवाल!
इसरूळ येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाल्यापासूनच अंदाजपत्रक आणि तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार काम करण्याची मागणी ग्रामस्थांसह संतोष भुतेकर यांनी केली होती. मात्र, वारंवार लक्ष वेधूनही संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अखेर भुतेकर यांनी प्रत्यक्ष टाकीवर जाऊन हातोड्याच्या साहाय्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले. या प्रकाराचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला असून, त्यातून संबंधित कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
अभियंत्यांकडे तक्रार; प्रशासनाला थेट सवाल!
या प्रकरणी संतोष भुतेकर यांनी चिखली ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांकडे रीतसर निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे. संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराकडून हे बांधकाम नव्याने करून घेणार की तांत्रिकदृष्ट्या आवश्यक दुरुस्ती करणार, याबाबत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच ग्रामस्थांना यासंदर्भात लेखी स्वरूपात माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा….
जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामातच अनियमितता होत असल्याचा आरोप समोर आल्याने इसरूळ येथील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, अशी भूमिका भुतेकर यांनी घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या आरोपांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग काय भूमिका घेतो आणि प्रत्यक्ष तपासणीत काय निष्पन्न होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.














