Advertisement Advertisement

EXCLUSIVE:विधान परिषदेच्या जागांवरून राजकारण तापलं, सिंदखेड राजात इच्छुकांची गर्दी! खेडेकर-काजी-वाघ यांच्यात सोशल मीडिया वर चर्चा…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त नऊ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून ३० एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांची चढाओढ वाढली असून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून “आमच्या नेत्याला विधान परिषदेची संधी द्या” अशी जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

राज्यातील सध्याच्या संख्याबळानुसार नऊ जागांपैकी सुमारे पाच जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर दोन जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला, एक जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, तर उर्वरित एक जागा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मिळू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या संभाव्य गणितामुळे प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी अंतर्गत स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे.

सिंदखेडराजा मतदारसंघात शिवसेनेकडून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष अॅड. नाझिर काजी आणि भाजपकडून प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांची नावे आघाडीवर चर्चेत आहेत. या तिघांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून आपापल्या नेत्यांच्या बाजूने प्रचार मोहीम छेडली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीत झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे शिवसेनेला फटका बसला होता आणि त्यात डॉ. शशिकांत खेडेकर यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप संधी न मिळाल्याने विधान परिषद ही त्यांच्यासाठी महत्त्वाची संधी मानली जात आहे. त्यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली असून कार्यकर्त्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ ऑनलाइन मोहीम तीव्र केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अॅड. नाझिर काजी यांचे नाव निष्ठावान व संघटनशील नेते म्हणून पुढे येत आहे. त्यांनी दीर्घकाळ पक्षासाठी काम केले असून त्यांना विधान परिषदेसाठी संधी देण्याबाबत पूर्वी आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन काजी यांच्या उमेदवारीसाठी जोरदार पाठपुरावा केला आहे.

एकूणच, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा मतदारसंघात राजकीय हालचाली वेगाने वाढल्या असून कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि नेत्यांमधील स्पर्धा यामुळे पुढील काही दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!