हळदीचा आनंद मातीत! दारू पिलेल्या पित्याचा लेकीवर जीवघेणा हल्ला….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील बर्डे प्लाट परिसरात मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमातच पित्याने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी घडली. कार्यक्रम बंद करण्याच्या कारणावरून वाद उफाळून आला आणि संतप्त पित्याने फरशीचा तुकडा मारून थेट मुलीच्या डोक्यात घाव घातला.

नजरानाबी जावेद खान (वय ४०) यांच्या घरी मुलगी मेहेक परवीन (वय १८) हिच्या विवाहानिमित्त हळदीचा कार्यक्रम सुरू होता. नातेवाईक व पाहुण्यांच्या उपस्थितीत आरोपी जावेद खान हा दारूच्या नशेत कार्यक्रमस्थळी पोहोचला. कार्यक्रम बंद करण्याची मागणी करत त्याने पत्नी व मुलांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने लहान मुलगा नवाज खान याला मारहाण केली.

भांडण सोडवण्यासाठी पत्नी व मुलगी मध्ये पडताच आरोपीने जमिनीवरील फरशीचा तुकडा उचलून मेहेक परवीन हिच्या डोक्यात मारला. यात तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. यानंतर पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. उपस्थित नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून प्रकार शांत केला. मात्र आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणी नजरानाबी जावेद खान यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी जावेद खान बुढन खान (रा. बर्डे प्लाट, खामगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!