मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सोशल मीडिया आणि फोनवरील ओळखींचे रूपांतर गंभीर गुन्ह्यांत होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणात, लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय मॉडेलवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव येथील शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला ‘झिरो एफआयआर’ मलकापूर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या माहितीनुसार, जळगाव येथील २५ वर्षीय पीडिता व्यवसायाने मॉडेलिंग करते. तिची ओळख मलकापूर तालुक्यातील कुंड खुर्द येथील ऋत्विक कडू कांबळे (वय २२) याच्याशी झाली होती. आरोपी हा पीडितेच्या आत्याच्या मित्राचा मावसभाऊ असल्याने दोघांमध्ये फोनवरून संवाद सुरू झाला. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाले.
दरम्यान, आरोपीने पीडितेला लग्नाचे आश्वासन देत २५ मार्च २०२२ रोजी स्थानिक मेदिनी आईस्क्रीम पार्लर येथे बोलावले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच २५ मार्च २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत आरोपीने वारंवार लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केल्याचे पीडितेने म्हटले आहे.
पीडितेने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याने तिने जळगाव येथील शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून प्रकरण मलकापूर शहर पोलिसांकडे वर्ग केले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे हे करीत आहेत.












