बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बनावट औषधांच्या वाढत्या धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच औषध व्यवसायातील सवलत प्रथा थांबविण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनानुसार बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि. २० मे) जिल्हाभरात एक दिवसीय बंद पाळण्यात आला.
यावेळी शहरातील संगम चौकातून मेडिकल व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढला. घोषणाबाजी करत मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात ऑनलाईन औषध विक्रीमुळे बनावट व निकृष्ट दर्जाच्या औषधांचा धोका वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही ठिकाणी सुरू असलेल्या अवाजवी सवलत प्रथेमुळे छोट्या मेडिकल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
दरम्यान, शहरातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आल्याने कडकडीत बंदचे चित्र पाहायला मिळाले. या आंदोलनाला मेडिकल चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाने मेडिकल व्यावसायिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आला













