किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथे २२ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. संजीवनी विजय दाभाडे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती विजय संजय दाभाडे (वय ३१) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे किनगाव राजा परिसरात खळबळ उडाली असून, दोन लहान मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, विजय दाभाडे याला दारूचे व्यसन होते. पत्नी संजीवनी ही कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून तो तिच्याशी वारंवार वाद घालून तिला मारहाण करीत असल्याचा आरोप आहे. २० ऑक्टोबर रोजीही त्याने संजीवनीला मारहाण केली होती. यानंतर संजीवनीचे वडील सुधाकर वाघमारे हे कुटुंबीयांसह किनगाव राजा येथे आले. त्यावेळी विजयने यापुढे दारू पिणार नाही आणि पत्नीसोबत भांडण करणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांतच संजीवनीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
२२ ऑक्टोबर रोजी सकाळी घरमालकाचा फोन आल्यानंतर संजीवनीचे आई-वडील आणि भाऊ तिच्या घरी पोहोचले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. विजयने दरवाजा उघडल्यानंतर संजीवनी पलंगावर चादर पांघरलेल्या अवस्थेत आढळली. चादर बाजूला केल्यानंतर तिच्या गळ्यावर दोरीचे वळ दिसून आले. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, याबाबत विचारणा केली असता विजयने पत्नीचा गळा आवळल्याचे सांगितले. या घटनेनंतर संजीवनीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
संजीवनी आणि विजय यांचा विवाह २०२१ मध्ये झाला होता. त्यांना आदित्य आणि अंतरा अशी दोन लहान मुले आहेत. आईच्या मृत्यूमुळे या दोन्ही चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून घडल्याचा आरोप असलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर यांच्या पथकाने कारवाई करून आरोपी विजय दाभाडे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस करीत आहेत.













