बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेतील प्रलंबित अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी Land Seeding, Aadhaar Seeding आणि e-KYC यापैकी कोणतीही प्रक्रिया प्रलंबित असल्यास ती तातडीने पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
PM-KISAN योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना DBT पद्धतीने आर्थिक मदत दिली जाते. मात्र हा लाभ पात्र आणि प्रमाणित लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी केंद्र शासनाने Land Seeding, Aadhaar Seeding आणि e-KYC या प्रक्रिया अनिवार्य केल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात अद्याप काही लाभार्थ्यांच्या या प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी आवश्यक पूर्तता न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
४,१०१ लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी लिंक नाहीत….
जिल्ह्यातील तब्बल ४ हजार १०१ लाभार्थ्यांची बँक खाती अद्याप आधार क्रमांकाशी संलग्न झालेली नाहीत. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मार्फत आधार संलग्न बँक खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. प्रक्रिया करताना अडचण आल्यास संबंधित बँक, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे.
२,०२८ लाभार्थ्यांची e-KYC बाकी….
PM-KISAN योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात २ हजार २८ लाभार्थ्यांची e-KYC अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय सन २०२६-२७ साठी वार्षिक e-KYC प्रलंबित असलेल्या २ लाख ६३ हजार ८०७ लाभार्थ्यांनीही e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
लाभार्थ्यांना जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे e-KYC करता येणार आहे. तसेच PM-KISAN मोबाईल अॅपच्या माध्यमातून Face Authentication वापरूनही e-KYC पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
३१ ऑक्टोबरची मुदत; शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नये….
विशेष मोहिमेच्या कालावधीतही अनिवार्य प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार विहित प्रक्रियेतून नव्याने अर्ज करून आवश्यक पडताळणी करावी लागू शकते. त्यामुळे PM-KISAN योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची Land Seeding, Aadhaar Seeding आणि e-KYC स्थिती तपासून घ्यावी आणि यापैकी कोणतीही प्रक्रिया प्रलंबित असल्यास ती ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कृषी प्रशासनाने केले आहे.
















