Advertisement Advertisement

गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या ४९ रुग्णांना मोठा दिलासा! PM राष्ट्रीय मदत निधीतून १ कोटी २० लाखांची मदत मंजूर….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): हृदयशस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग यांसह गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांचा आर्थिक भार सहन करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून या रुग्णांसाठी तब्बल १ कोटी २० लाख ६६ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ही मदत संबंधित रुग्णालयांकडे उपचारासाठी वर्ग करण्यात आली आहे.

२०२४ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या खासदार सुविधा केंद्र व वैद्यकीय मदत कक्षाकडे गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी विविध रुग्णांची प्रकरणे आली होती. आवश्यक कागदपत्रांसह सादर झालेल्या या प्रकरणांवर संबंधित कार्यालयामार्फत कार्यवाही करण्यात आली.

कागदपत्रांची पूर्तता ते निधी मंजुरीपर्यंत मदत….

गंभीर आजारांवरील उपचाराचा खर्च परवडत नसलेल्या रुग्णांकडून वैद्यकीय कागदपत्रे, उपचारांचा अंदाजित खर्च आणि आवश्यक माहिती घेऊन प्रकरणे सादर करण्यात आली. त्यानंतर खासदार जाधव यांच्या कार्यालयामार्फत ही प्रकरणे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक स्तरावर मांडण्यात आली.

कागदपत्रांची पूर्तता, उपचारासंबंधी माहिती तसेच निधी मिळविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रियेतही रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना कार्यालयाकडून सहकार्य करण्यात आले.

७३ प्रकरणांपैकी ४९ रुग्णांना मंजुरी….

३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत एकूण ७३ रुग्णांची प्रकरणे समोर आली होती. त्यापैकी ४९ रुग्णांच्या उपचारासाठी १ कोटी २० लाख ६६ हजार रुपयांची मदत मंजूर झाली असून निधी संबंधित रुग्णालयांकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, २१ रुग्णांची प्रकरणे अद्याप प्रक्रियेत असून ३ प्रकरणांना मंजुरी मिळालेली नाही.

७३ प्रकरणांचे चित्र…..

एकूण प्रकरणे : ७३

मदत मंजूर झालेले रुग्ण : ४९

प्रक्रियेत असलेली प्रकरणे : २१

मंजूर न झालेली प्रकरणे : ३

मंजूर अर्थसाहाय्य : ₹१,२०,६६,०००

गंभीर आजारांच्या उपचारासाठी आधार….

प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पात्र रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, या निधीसाठी अर्ज करताना वैद्यकीय कागदपत्रे, उपचारांचा अंदाजित खर्च आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांसाठी योग्य मार्गदर्शन आणि कागदपत्रांची पूर्तता करून देणे महत्त्वाचे ठरते.

बुलढाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना मिळालेली १ कोटी २० लाखांहून अधिक रुपयांची मदत ही गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!