दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): बिबी येथील महावितरण कार्यालयातील कर्मचारी व बाहेरून आलेल्या विशेष पथकावर वीज चोरीविरोधातील कारवाईदरम्यान हल्ला झाल्याची घटना २६ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास किनगाव जंक येथे घडली. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले असून, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई येथील विशेष पथक वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बिबी अंतर्गत येणाऱ्या किनगाव जंक येथे गेले होते. या पथकात सहाय्यक अभियंते समाधान दिनकर पाटील, चंद्रकांत तान्हाजी पाटील, अक्षय गजानन वंजारी, अतुल संतोष बावस्कर यांच्यासह बिबी कार्यालयातील कर्मचारी कोमल रामराव राठोड, विशाल महादेव वानखडे तसेच जीनस कंपनीचे गोरखनाथ सखाराम चव्हाण, ओम सदाशिव जाधव आणि ओम दिलीप आंधळे यांचा समावेश होता.
पथक किनगाव जंक येथील बाजार गल्ली परिसरात वीज चोरी संदर्भात मीटर जोडणीला जाणाऱ्या केबल कनेक्शनची तपासणी करत होते. त्यावेळी केबलला अनधिकृत जॉइंट आहे का, याची खात्री केली जात असताना अनिल भगवान नागरे हा अचानक तेथे आला. त्याने पथकातील अधिकारी समाधान पाटील व संजय खार्डे यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालय, बिबी येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रेफर करण्यात आले आहे.
या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याप्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.















