Advertisement Advertisement

नऊ महिने पोटात बाळ वाढवलं, पण बाळाचा आणि आईचा संसार फुलण्याआधीच काळाचा घाला! मृत्यूच्या प्रकरणात सासरच्यांवर गुन्हा!

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील राहेरी येथील स्वाती ऊर्फ समीक्षा निंबाळकर या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मुलगी आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तिचे वडील सदाशिव शंकर देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देशमुख यांच्या तक्रारीनुसार, स्वाती ऊर्फ समीक्षा हिचा विवाह ३० मार्च २०२१ रोजी पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील विशाल अनिल निंबाळकर याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचा काळ सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच माहेरून दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे.

दरम्यान, गर्भधारणेदरम्यान स्वातीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते. ६ सप्टेंबर २०२६ रोजी तिला सृष्टी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी गर्भातील पाण्याचे प्रमाण कमी असून बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तातडीने रुग्णालयात दाखल करून सिझेरियन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, या सूचनेनंतरही तिला रुग्णालयात दाखल न करता घरी आणण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

त्यानंतर २५ सप्टेंबर २०२६ रोजी स्वाती ऊर्फ समीक्षा हिचा मृत्यू झाला. तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून २९ सप्टेंबर रोजी पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाचोड पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०४०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, १०६(१) आणि ३(५) अन्वये पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल रंगनाथ निंबाळकर, सासू शारदा अनिल निंबाळकर आणि अश्वर्या नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत. स्वाती आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू नेमका कोणत्या वैद्यकीय कारणामुळे झाला, उपचारांची किती आवश्यकता होती आणि उपचार मिळण्यात विलंब झाला का, याबाबत वैद्यकीय अहवाल व पोलिस तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!