धोत्रा भणगोजी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : धोत्रा भणगोजी येथे ३० वर्षीय मजूर मोहन भगवान चव्हाण यांचा बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. गावातील देविदास शेंडगे यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मोहन चव्हाण हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, पाण्याअभावी कामे ठप्प झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक परिस्थिती आणि इतर समस्यांमुळे मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलीस ठाण्याचे बीट जमादार बिलगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.
मोहन चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.














