Advertisement Advertisement

हॉटेलजवळ नाश्ता सुरू असतानाच काळ बनून आली ओमनी! बाप-लेकाच्या क्षणात काळाचा घाला; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुलासोबत हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला बसून नाश्ता करीत असलेल्या तरुणाला भरधाव ओमनी कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या बन्सिलाल कनासे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नांदुरा तालुक्यातील तरवाडी बसस्टॉपजवळ घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बन्सिलाल कनासे हे आपल्या मुलासोबत तरवाडी बसस्टॉपजवळील हॉटेल परिसरात रस्त्याच्या बाजूला बसून नाश्ता करीत होते. याचवेळी सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील रहिवासी दीपक भगवानसिंग शिंदे हा एमएच ०८ आर २३१९ क्रमांकाची ओमनी कार भरधाव वेगाने चालवत तेथून जात होता. वाहनावरील नियंत्रण आणि वेगाकडे दुर्लक्ष करीत चालकाने कारने बन्सिलाल कनासे यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात बन्सिलाल कनासे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी मृतकाचे भाऊ हिरालाल प्यारसिंग कनासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी ओमनी चालक दीपक भगवानसिंग शिंदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१ आणि १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुपडासिंग चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!