Advertisement Advertisement

चिखली -जालना भरधाव महामार्गावर रोहीचा जीव गेला; बारा तास रस्त्यावर पडूनही वन विभागाला पत्ता नाही! येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला रोही दिसला पण वनविभागाला काही माहीत नाही का?

मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली ते जालना महामार्गावर रामनगर शिवारात अशोक काळे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी जातीचा रोही ठार झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धडक इतकी जोरदार होती की रोहीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्याचा मृतदेह भरधाव महामार्गावरच पडून राहिला. मात्र सकाळपर्यंत या घटनेकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष गेले नसल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, तब्बल बारा तासांहून अधिक काळ हा वन्यप्राणी रस्त्यावरच पडून असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांसाठीही धोका निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी अपघातग्रस्त रोही रस्त्यावर पडून राहिल्याने आणखी एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान, सकाळी सुमारे दहा वाजता दिव्यमराठीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार उद्धव थुट्टे पाटील यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचतो, असे सांगितल्याची माहिती आहे.

वन विभागाने वन्यप्राण्याच्या मृतदेहाची तातडीने विल्हेवाट लावून नियमानुसार पुढील कारवाई करणे अपेक्षित असताना एवढ्या वेळानंतरही कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. वन्यजीव रस्त्यावर अपघातात ठार होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी कुठे असते, असा प्रश्नही आता नागरिकांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, या घटनेची वन विभागाने गंभीर दखल घेऊन मृत रोहीचा पंचनामा करून नियमानुसार विल्हेवाट लावावी तसेच अज्ञात वाहनाचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महामार्गावर वन्यप्राण्यांच्या हालचाली असलेल्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्याचीही गरज निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!