अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये सध्या अवैध दारू विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू असून, यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये अवैध दारू विक्रीविरोधात तक्रारी केल्या जातात. त्यानंतर पोलिसांकडून तात्पुरती कारवाई केली जाते; मात्र काही दिवसांतच संबंधित विक्रेते पुन्हा जोमाने आपला धंदा सुरू करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईची सातत्यता आणि प्रभावीपणा यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
“दारू गावात येते कशी?”
गावागावात अवैध दारूचे बॉक्स कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचतात कसे? दिवसाढवळ्या विक्री होत असताना प्रशासनाला याची माहिती नसते का? की यामागे राजकीय पाठबळ अथवा मूक संमती आहे? असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चिले जात आहेत.
तक्रारदारांच्या नाकावर टिचून अवैध दारू विक्री सुरू असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या विक्रेत्यांना कोणाचे अभय आहे, कायद्याचा धाक संपला आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. काही ठिकाणी बिट अंमलदारांच्या दुर्लक्षामुळे किंवा वरदहस्तामुळे हे प्रकार सुरू असल्याचीही चर्चा रंगत आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर…
अवैध दारू विक्रीमुळे गावागावात भांडण-तंटे वाढले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना इतर अवैध गोष्टी जसे की अफू किंवा गांजाच्या लागवडीची माहिती मिळते, मात्र भर दिवसा सुरू असलेली दारू विक्री आणि वाहतूक दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
यामागे आर्थिक व्यवहारांचा कोणताही संबंध आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गावातील शांतता राखण्यासाठी पोलिसांनी ठोस व सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












