मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी व निकषांच्या निषेधार्थ मोताळा तालुक्यातील युवा शेतकरी शुभम घोंगटे यांनी बुधवारी अर्धनग्न आंदोलन करत अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला. “माझी किडनी घ्या, पण शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा” अशी मागणी करत त्यांनी तहसीलदारांना स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र सादर केले.
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक अटी व निकष लादल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांना नव्या निर्णयात प्रत्यक्ष लाभ मिळण्यास अडथळे निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान शुभम घोंगटे यांनी स्टॅम्प पेपरवर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “घामाची किंमत देता आली नाही तर रक्ताची किंमत करा”, “शेती मातीमोल झाली आहे, म्हणून आता स्वतःलाच बाजारात विकायला काढले आहे” अशा तीव्र शब्दांत त्यांनी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली.
शेतीतून उत्पन्न मिळत नसताना बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, डिझेल आणि मजुरीचा खर्च सातत्याने वाढत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कर्जमाफीच्या नावाखाली अटींचे जाळे टाकून शासनाने शेतकऱ्यांना नव्या चक्रव्यूहात अडकविले असल्याचा आरोप करत सर्व जाचक अटी तत्काळ रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी शुभम घोंगटे व अमोल देशमुख यांनी केली.
शासनाविरोधातील हा संताप केवळ एका शेतकऱ्याचा नसून ग्रामीण भागातील हजारो कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मनातील अस्वस्थतेचा आवाज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनात अमोल देशमुख, संतोष पाटील यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.















