खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शेलोडी शिवारात रामदेव ढाब्याजवळ दोन ट्रकांमध्ये भीषण अपघात होऊन एका ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना १७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकमधील तेलाचे डबे फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले असून खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमिर शेख हनीफ शेख (वय ६३, रा. अक्सानगर, वरणगाव, जि. जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अजिरोददीन शेख रफीआवेददीन (रा. वरणगाव) तसेच ट्रक क्रमांक एमपी ०९-एचएच ४५४० च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ट्रक क्रमांक एमएच १९-सीएक्स २९३५ चा चालक आरोपी अजिरोददीन याने ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालवत समोरील ट्रक क्रमांक एमपी ०९-एचएच ४५४० ला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, ट्रकची केबिन अक्षरशः चुराडा झाली. अपघातात आरोपी चालक स्वतः गंभीर जखमी झाला.
दरम्यान, समोरील ट्रक चालकाने वाहन रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभे करून कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रकला अपघात टाळणे शक्य झाले नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात ट्रकमधील तेलाचे डबे फुटल्याने मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. पुढील तपास खामगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे.












