मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या आणखी दोघांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दाताळा येथील रहिवासी असून ती इयत्ता ८ वीमध्ये शिक्षण घेत आहे. सन २०२५ मध्ये तिच्या घराचे बांधकाम सुरू असताना आरोपी तोफीख शाह अताउल्हा शाह उर्फ शाहरुख (रा. पारपेठ, मलकापूर) हा वारंवार त्यांच्या घरी येत होता. याच दरम्यान त्याची पीडितेशी ओळख झाली.
डिसेंबर २०२५ मध्ये पीडितेचे आई-वडील घरात नसताना आरोपी तोफीख शाह हा मुज्जु शाह साबीर शाह आणि शाकीर शाह यांच्यासह तिच्या घरी आला. त्यावेळी मुज्जु आणि शाकीर हे घराबाहेर पाळत ठेवून उभे राहिले, तर मुख्य आरोपीने मुलीला जबरदस्तीने घरात ओढून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
धमकी आणि भीतीमुळे पीडिता गप्प राहिली. मात्र जानेवारी २०२६ मध्येही आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने धाडस करून ११ मे रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत आपबिती सांगितली.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तोफीख शाह अताउल्हा शाह उर्फ शाहरुख (रा. पारपेठ, मलकापूर), मुज्जु शाह साबीर शाह (रा. बुलडाणा, ह.मु. पारपेठ, मलकापूर) आणि शाकीर शाह (रा. मुस्ताक अली नगर, मलकापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड हे करीत आहेत.













