Advertisement Advertisement

पळशी बुद्रुक शिवारातील विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू! शिकार करताना विहिरीत पडल्याचा वन विभागाचा प्राथमिक अंदाज; वन्यप्राणी बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढला….

पळशी बुद्रुक शिवारातील विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू! शिकार करताना विहिरीत पडल्याचा वन विभागाचा प्राथमिक अंदाज; वन्यप्राणी बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढला….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पळशी बुद्रुक शिवारातील एका शेतातील विहिरीत पडून अंदाजे एक ते दीड वर्ष वयाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी, १३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली.

पळशी बुद्रुक येथील शेतकरी अनिल तुळशीराम बोराळे यांच्या गट क्रमांक ३४४ मधील शेतातील विहिरीत बिबट पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. माहिती मिळताच स्थानिक वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच बुलडाणा येथील वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता सुमारे सहा फूट पाणी असलेल्या विहिरीत बिबट्या मृतावस्थेत तरंगताना आढळून आला. वन विभागाच्या पथकाने तत्काळ मृत मादी बिबट्याला विहिरीबाहेर काढले.

तपासणीदरम्यान मृत बिबट्या अंदाजे एक ते दीड वर्ष वयाची मादी असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या शरीरावर कोणत्याही नवीन अथवा जुन्या जखमेच्या खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे शिकार करण्याच्या प्रयत्नात ही मादी बिबट्या विहिरीत पडली असावी, असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

यानंतर मृत मादी बिबट्याचा मृतदेह तालुका पशुवैद्यकीय रुग्णालय, खामगाव येथे नेण्यात आला. पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. डी. पडोळ, डॉ. राजेश अवताडे व डॉ. अमोल साळगे यांच्या पथकाने शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर वन विभागाच्या नियमानुसार मृत मादी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ही कारवाई उपवनसंरक्षक, बुलडाणा वन विभाग जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एम. काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार, वनपाल श्रीनाथ, वनरक्षक धारपवार तसेच बुलडाणा वन्यप्राणी बचाव पथकातील संदीप मडावी, मिलिंद इंगळे व अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!