चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज):शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसह पीकविमा, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करणे, सौर ऊर्जा योजनेतील सक्ती थांबविणे, मागेल त्याला वीज जोडणी देणे तसेच कृषी अवजारे व फळबाग योजनांचे रखडलेले अनुदान तातडीने वितरित करावे, या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.
याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. पोलीस निरीक्षकांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विलास वसू, नवलसिंग मोरे, सरदारसिंग इंगळे, गजानन कुटे, दत्ता मोरे, राजेंद्र मोरे, सुमंथा वसू, विठ्ठल वसू, ईश्वर कमळीक, मंगेश भगवानराव मोरे, गणेश मोरे, बळीराम मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, सकाळीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भगवानराव मोरे, भारत वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना बीएनएसएस २०२३ च्या कलम १६८ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन समज देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून चिखली तालुक्यात रास्ता रोको आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या नोटिशीत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२६(२) नुसार रास्ता रोको हा गुन्हा असल्याचे नमूद करण्यात आले असून, आंदोलनादरम्यान सार्वजनिक शांतता भंग होईल, मालमत्तेचे नुकसान होईल किंवा प्रक्षोभक घोषणाबाजी झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी १३ जून २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार १४ जून ते १८ जूनदरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
यावेळी विनायक सरनाईक यांनी सरकारवर टीका करत, “शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. सरकारने मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. घरोघरी नोटिसा देऊन व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल करण्यापेक्षा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,” अशी भूमिका मांडली.
दुसरीकडे, दिवठाणा येथील शेतकऱ्यांनीही रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. “तुपकर यांनी यापूर्वीच्या आंदोलनातून शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून दिला. आजही ते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत.
आम्ही तुपकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशी भावना दिवठाणा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन १५ जूनपासून सुरू असून चौथा दिवस उलटल्यानंतरही शासनाने दखल न घेतल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनांची तीव्रता वाढत आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या असून, राज्यभरातील शेतकरी “अभी नहीं तो कभी नहीं” या निर्धाराने एकत्र येत असल्याने सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.













