धाड(बुलडाणा कव्हरेज न्युज) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुधा (ता. बुलढाणा) येथील प्रसिद्ध मर्दडी देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ४ ऑगस्टच्या मध्यरात्री घडलेल्या या चोरीत चोरट्यांनी तब्बल २ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीची घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात हँडग्लोव्हज घातलेले दोन चोरटे दिसून आले आहेत.
दुधा येथील मर्दडी देवीचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराचे पुजारी विलास पांडुरंग दांडगे (वय ४३) हे ४ ऑगस्ट रोजी रात्री मंदिराच्या गाभाऱ्याला कुलूप लावून घरी गेले होते. मंदिराच्या सभागृहात दोघेजण झोपलेले होते. दरम्यान, रात्री साडेनऊ ते ५ ऑगस्टच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या पश्चिम बाजूच्या ग्रील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
यानंतर चोरट्यांनी मुख्य गाभाऱ्याच्या ग्रील गेटचेही कुलूप तोडले. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर देवीच्या डोक्यावरील एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट (किंमत २० हजार रुपये), ७५० ग्रॅम वजनाचा चांदीचा नाग (किंमत १० हजार रुपये), ५०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका (किंमत ७२ हजार रुपये) तसेच देवीच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या पोती (किंमत १ लाख ७५ हजार रुपये) असा एकूण २ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
मात्र, आजच्या बाजारभावानुसार या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची किंमत अंदाजे सहा ते सात लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी मंदिर उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि तपासाबाबत पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
चोरीचा तपास वेगाने करण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयित चोरटे कैद झाल्याचे समोर आले.
दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने पोबारा….
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही चोरट्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधल्याचे आणि हातात हँडग्लोव्हज घातल्याचे दिसून आले आहे. चोरी केल्यानंतर हे दोघेही दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने पसार झाल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.
या घटनेनंतर धाड पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली आहेत. दुधा ते बुलढाणा, बुलढाणा ते शिवना (जि. छत्रपती संभाजीनगर) या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवना ते फर्दापूरपर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चोरट्यांचा लवकरच छडा लागण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, पुजारी विलास पांडुरंग दांडगे यांच्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मंदिरासारख्या श्रद्धास्थानी झालेल्या या धाडसी चोरीमुळे दुधा परिसरातील नागरिक व भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.














