सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सुलतानपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ३० सप्टेंबर रोजी भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक श्रीहरी धुडकेकर (रा. सुलतानपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भरधाव टिप्परने दीपक धुडकेकर यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना मेहकर येथील अजंठा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून दीपक यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाही अखेर ७ ऑक्टोबर रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सुलतानपूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित टिप्पर अडवून चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. विशेष म्हणजे, संबंधित टिप्परला वाहन क्रमांक नसल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी दीपक यांचे वडील श्रीहरी धुडकेकर यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २८१, १२५ (ए) व १२५ (बी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.















