मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनचे संपूर्ण पीक करपले. त्यातच महिंद्रा फायनान्सचे कर्ज आणि मुलगा-तीन मुलींच्या लग्नासाठी झालेला खर्च यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ६२ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अंत्री खेडेकर येथे घडली. जनार्धन एकनाथ खेडेकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
जनार्धन खेडेकर यांची अंत्री खेडेकर शिवारातील गट नं. ४३/०१ मध्ये एक हेक्टर कोरडवाहू शेती आहे. यावर्षी त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पावसाचा दीर्घ खंड पडल्याने संपूर्ण सोयाबीन पीक करपले. त्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा मावळली. दुसरीकडे त्यांनी महिंद्रा फायनान्सकडून सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मुलगा आणि तीन मुलींच्या लग्नासाठी झालेल्या खर्चामुळेही कुटुंबावर आर्थिक भार वाढला होता.
वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांचा मुलगा संभाजीनगर येथे कंपनीत कामाला गेला होता. मुलगा कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच शेतातील संपूर्ण पीक हातातून गेल्याने जनार्धन खेडेकर आर्थिक विवंचनेत होते. या परिस्थितीत ६ ऑक्टोबर रोजी मुलगा व सून कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. काही वेळाने त्यांनी घरातील सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.
सायंकाळी मुलगा व सून घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आवाज देऊनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी जनार्धन खेडेकर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचांसमक्ष पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.













