देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी देऊळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात संबंधित चारचाकी वाहनचालकाविरुद्ध शुक्रवारी (दि.३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश रंगनाथ पाटोळे (वय ३८, रा. शिवाजीनगर, देऊळगाव राजा) हे एमएच २१ एझेड १४४२ क्रमांकाच्या मोटारसायकलने जालना येथून देऊळगाव राजा येथे घरी परत येत होते. त्याच वेळी त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या एमएच २८ बीक्यू १९८१ क्रमांकाच्या कारचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीस जोरदार धडक दिली.
या धडकेत प्रकाश पाटोळे हे दुचाकीवरून रस्त्यावर कोसळले. त्यांना डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून जखमीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित कारचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.














