नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : माहेरहून १० लाख रुपये आणि दुचाकी आणावी, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. तसेच घरकामावरूनही विवाहितेला त्रास दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नंदिनी जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, पती अनिल सुरेश जाधव (रा. ठाणे) याने लग्नानंतर काही महिने चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर पती अनिल सुरेश जाधव, जेठ किशोर सुरेश जाधव, सासरे सुरेश गोंडू जाधव, जेठाणी रत्नमाला किशोर जाधव आणि सासू आशा सुरेश जाधव यांनी हुंड्याच्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
माहेरहून १० लाख रुपये आणि दुचाकी आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. तसेच घरकामावरूनही शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे.
या तक्रारीच्या आधारे नांदुरा पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.













