Advertisement Advertisement

१५ जूनला धडक कारवाई झाली, पण गुटख्याचा धंदा पुन्हा जोमात! देऊळगाव राजात प्रशासनाचा धाक गेला कुठं?

देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): अन्न व औषध प्रशासनाच्या गुटखा व भेसळविरोधी धडक कारवायांनंतर काही काळ थंडावलेली अवैध गुटखा विक्री आता पुन्हा सुरू झाल्याची चर्चा देऊळगाव राजा तालुक्यात रंगली आहे. १५ जून २०२६ रोजी झालेल्या कारवाईनंतर काही दिवस गुटखा विक्रेत्यांमध्ये प्रशासनाचा धाक निर्माण झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये गुटखा पुन्हा सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

गुटखा विक्रीविरोधातील पुढील कारवाईबाबत माहिती घेण्यासाठी संबंधित अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

१५ जूनच्या कारवाईनंतर पुन्हा जैसे थे?

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळखोर तसेच अवैध गुटखा विक्रेत्यांविरोधातील कारवायांना वेग आल्याचे चित्र होते. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये काही काळ चांगलीच खळबळ उडाली होती. देऊळगाव राजा तालुक्यात १५ जून रोजी झालेली कारवाईही चर्चेचा विषय ठरली होती.

या कारवाईनंतर काही काळ विक्रेत्यांनी गुटख्याचे व्यवहार आटोपते घेतल्याचे दिसून आले. मात्र, आता पुन्हा अनेक ठिकाणी गुटखा उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गुटखा मिळणे बंद होण्याऐवजी त्याचे दर वाढल्याचीही चर्चा असून, त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असताना अवैध विक्रेत्यांना मात्र फायदा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

अंढेरा परिसर गुटख्याचा ‘हब’ बनतोय?

मराठवाड्याच्या सीमेवरील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. कोंनड, शेळगाव, आटोळ, इसरूळ, चिंचखेड आणि मंडपगाव या परिसरात गुटख्याच्या वाहतुकीशी संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर फिरत असल्याचेही सांगितले जात आहे.

अवैध गुटख्याची वाहतूक व विक्री होत असल्याच्या तक्रारी असूनही स्थानिक पातळीवर प्रभावी कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या तक्रारींची प्रशासनाने स्वतंत्रपणे पडताळणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

‘कारवाई झाली, पण गुटखा बंद झाला नाही’!

गुटखा विक्रीवर अधूनमधून कारवाई करून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. गुटख्याची वाहतूक करणारे, साठवणूक करणारे आणि विक्री करणारे यांची साखळी शोधून सातत्याने तपासणी व कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

एकीकडे मोठ्या कारवाईची घोषणा होते आणि दुसरीकडे काही दिवसांतच गुटखा पुन्हा बाजारात सहज उपलब्ध होतो, अशी परिस्थिती असेल तर कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कारवाईचे आकडे न दाखवता गुटख्याच्या पुरवठ्याची संपूर्ण साखळी शोधून त्यावर कायमस्वरूपी लगाम घालावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रशासनासमोर नागरिकांचे सवाल…

१५ जूनची कारवाई केवळ काही दिवसांपुरतीच मर्यादित राहिली का? गुटखा पुन्हा सहज उपलब्ध कसा होत आहे? अवैध गुटखा विक्रीला नेमके कोणाचे पाठबळ आहे? तक्रारी असूनही सातत्यपूर्ण कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न सध्या देऊळगाव राजा तालुक्यात उपस्थित केले जात आहेत.

गुटखा विक्रीविरोधात प्रशासन पुढील काळात कोणती भूमिका घेते आणि अंढेरा परिसरासह तालुक्यातील संशयित ठिकाणी धडक तपासणी केली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!