चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीतील परमहंस मौनीबाबा संस्थान येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळा, जंगी रोड शो, पक्षप्रवेश सोहळा आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला हजारो नागरिक, युवक, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण चिखली शहर भगवेमय झाले होते.


. जाहिरात 👆
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे, क्रेनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी आणि युवकांचा उत्स्फूर्त जल्लोष यामुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून पुष्पहार आणि घोषणांच्या माध्यमातून मृत्युंजय गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले.
शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र कार्यक्रमातून दिसून आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार संजुभाऊ गायकवाड म्हणाले, “आम्ही सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहोत. सत्तेपेक्षा जनतेचा विश्वास आमच्यासाठी मोठा आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, विकासकामे करणे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे हीच शिवसेनेची खरी परंपरा आहे.”
चिखली मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्यासाठी गावोगावी फिरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गाव, वाडी आणि समाजघटकापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
युवकांचा उत्स्फूर्त सहभाग….
कार्यक्रमात युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. राहुल शिराळे या युवकाने हातावर मृत्युंजय गायकवाड यांच्या चेहऱ्याचा टॅटू गोंदविला होता. या टॅटूचे अनावरण आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप….
वाढदिवसाचे औचित्य साधून एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या आवश्यक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
“हा सन्मान प्रत्येक शिवसैनिकाचा…..
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मृत्युंजय संजय गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले, “माझ्या वाढदिवसानिमित्त चिखलीकरांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद आणि अभूतपूर्व प्रतिसाद आयुष्यभर विसरणार नाही. हा सन्मान माझा नसून प्रत्येक शिवसैनिकाचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे. या प्रेमामुळे जनतेच्या सेवेसाठी माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.”
सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजयजी सोनार, नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाउंडेशनचे पृथ्वीराज संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, माजी जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे, किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, उपजिल्हाप्रमुख शिवाजीबापू देशमुख, कल्पनाताई बोधेकर, निलेश गुजर यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, युवक, नागरिक आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा वाढता जनसंपर्क, युवकांमधील सहभाग आणि संघटनात्मक ताकद यांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे….
















