बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): अमली पदार्थ माफियांचे कंबरडे मोडणाऱ्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेनंतर बुलढाणा जिल्हा पोलिसांनी आता महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणा स्तरावर ‘दामिनी’ पथक सक्रिय करण्यात आले असून, शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींमध्ये कायदे, सुरक्षा आणि स्वसंरक्षणाबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे.
महिला व मुलींची रस्त्यांवरील छेडछाड रोखणे, टवाळखोरांवर कठोर कारवाई करणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दामिनी पथके नियमित गस्त घालत असून संशयित आणि टवाळखोरांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
जिल्ह्यातील तरुणांना व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेला यश मिळाल्यानंतर आता महिला सुरक्षेला प्राधान्य देत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके, कोचिंग क्लासेस तसेच बाजारपेठांमध्ये दामिनी पथके नियमित भेटी देत असून छेडछाड करणाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
नवीन कायद्यांची माहिती विद्यार्थिनींपर्यंत
या जनजागृती अभियानात भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष अधिनियम (BSA) यांतील महिलांच्या संरक्षणासंबंधी तरतुदींची माहिती विद्यार्थिनींना दिली जात आहे. तसेच महिलांचे कायदेशीर अधिकार, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, स्वसंरक्षणाचे महत्त्व आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.
शाळा-महाविद्यालयांमध्ये थेट संवाद
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या निर्देशानुसार बुलढाणा, खामगाव, मलकापूर, मेहकर आणि देऊळगाव राजा या उपविभागांतील पोलीस अधिकारी आणि दामिनी पथक शाळा-महाविद्यालयांना भेटी देत आहेत. विद्यार्थिनींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात असून, महिलांसाठी उपलब्ध असलेल्या ‘डायल 112’ आणि इतर मदतसेवांबाबत माहिती दिली जात आहे.
याशिवाय शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांशीही संवाद साधून परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, कायद्याविषयी जागरूकता वाढविणे आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.















