Advertisement Advertisement

समृद्धी महामार्गावर तिहेरी अपघात; ट्रकच्या अचानक लेन बदलण्याने भीषण दुर्घटना, एक जण….

दुसरबीड/सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्युज): समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये रविवारी (२६ जुलै) पहाटे झालेल्या तिहेरी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. अज्ञात ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने हा साखळी अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्र, सिंदखेडराजा येथील पोलिस, एमएसएफ जवान, १०८ रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे ३.५५ वाजता समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३३६.२०० (नागपूर कॉरिडॉर) येथे अपघात झाल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षाकडून समृद्धी महामार्ग उपकेंद्राला मिळाली. माहिती मिळताच पोलिस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून नागपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स (क्र. एमएच-१४ एलएक्स-१३२०) अज्ञात ट्रकच्या मागे प्रवास करत होती. यावेळी ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने ट्रॅव्हल्सची ट्रकला पाठीमागून धडक बसली. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या कार (क्र. एमएच-४३ सीयू-११६१) ने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने तिहेरी साखळी अपघात घडला.

या अपघातात ट्रॅव्हल्समधील विनोद नागोश (वय ४७) व खलील खान (वय ५५) तसेच कारमधील प्रणव मिश्रा (वय ४४) आणि मोहित मिश्रा हे किरकोळ जखमी झाले. तर मनीष पांडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच एचसी गायकवाड, पीसी २६११, एमएसएफचे जवान, १०८ रुग्णवाहिका चालक दिगांबर शिंदे व सुशील मरमट यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. डॉ. वैभव बोराडे आणि डॉ. यासीन शहा यांनी जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सिंदखेडराजा येथील रुग्णालयात हलविले.

अपघातानंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या १२० किमी प्रतितास वेगाच्या लेनमध्ये अडकल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरक्षितपणे सुरू ठेवली, त्यामुळे काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाचा शोध सुरू असून पुढील तपास सिंदखेडराजा पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!