खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्याशी विवाह केल्याचा तसेच ती गर्भवती झाल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ नोव्हेंबर २०२५ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारीनुसार, आरोपीने मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्याशी विवाह केला. त्यानंतर संबंधित मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आले.
मुलीची प्रकृती बिघडल्याने नातेवाइकांनी तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे दाखल केले. तेथे महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरुवातीला हा गुन्हा अकोला सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. मात्र, घटना हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निष्पन्न झाल्याने सीसीटीएनएस प्रणालीद्वारे हे प्रकरण हिवरखेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत.













