Advertisement Advertisement

भरधाव कारची समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी, चालक अपघातानंतर फरार!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा-चिखली मार्गावरील दगडवाडी शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना १० जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. अपघातानंतर जखमींना मदत न करता संबंधित चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी १३ जुलै रोजी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंबरखेड येथील प्रदीप भगवान खार्डे (वय ३३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रदीप खार्डे आणि त्यांचे मित्र ज्ञानेश्वर दिनकर वाघ (रा. डिग्रस, ता. देऊळगाव राजा) हे कारने प्रवास करत असताना दगडवाडी शिवारात विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत प्रदीप खार्डे आणि ज्ञानेश्वर वाघ हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

फिर्यादीनुसार, अपघात घडल्यानंतर संबंधित कारचालकाने जखमींची कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!