चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात सध्या बनावट खवा आणि त्यापासून तयार होणाऱ्या पेढे-बर्फीच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अहमदाबाद येथून दररोज मोठ्या प्रमाणात बनावट खवा ट्रॅव्हल्स बसद्वारे चिखलीत आणला जात असून, त्याचे शहरासह परिसरातील विविध स्वीटमार्टमध्ये वितरण केले जात आहे. या खव्यापासून तयार होणारी मिठाई शुद्ध दूध आणि खव्यापासून बनविल्याचा दावा करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दररोज पहाटे ट्रॅव्हल्स बसमधून शेकडो किलो बनावट खवा चिखलीत उतरवला जातो. त्यानंतर सकाळीच हा माल विविध मिठाई विक्रेत्यांकडे पोहोचविला जातो. या मालाची कोणतीही अधिकृत नोंद किंवा कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, अनेक मोठे स्वीटमार्ट चालक स्थानिक शेतकरी किंवा डेअरीकडून दूध अथवा खवा खरेदी करत नसतानाही त्यांच्या दुकानात दररोज मोठ्या प्रमाणात पेढे, बर्फी आणि इतर मिठाईची विक्री कशी होते, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे पारंपरिक पद्धतीने दुधापासून शुद्ध खवा तयार करणारे स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडल्याचेही बोलले जात आहे. स्वस्त दरातील कथित बनावट खव्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
‘पेढ्यावर माशीही बसत नाही’ अशी चर्चा….
स्थानिक स्तरावर या कथित बनावट खव्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पेढ्यांबाबत विविध चर्चा सुरू आहेत. काही जाणकारांच्या मते, या पेढ्यांवर माशीही बसत नाही. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या मिठाईत पामतेल किंवा इतर घटकांचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात येत असला तरी याबाबत संबंधित यंत्रणेकडून तपास होणे आवश्यक आहे.
अधिकृत बिल-पावत्यांचा अभाव?
सूत्रांच्या माहितीनुसार, अहमदाबादहून येणारा हा खवा खरेदी करणाऱ्या काही विक्रेत्यांकडे अधिकृत बिल किंवा पावत्या नसल्याचा आरोप आहे. तसेच, ग्राहक किंवा अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी चौकशीसाठी आल्यानंतर मिठाई शुद्ध दुधापासून तयार केल्याचे सांगून दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.
चौकशीची मागणी…
या संपूर्ण प्रकरणाची अन्न व औषध प्रशासन, अन्न सुरक्षा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून बनावट खव्याचा पुरवठा, त्याचे स्रोत आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










