बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्तीची आकडेवारी समोर आली असून, बूथस्तरावरील संघटनात्मक ताकदीत भाजप आणि शिंदेसेना यांच्यात चुरशीची स्पर्धा दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण ७,०६५ बीएलए नियुक्त करण्यात आले असून, भाजपने २,१०६ बीएलएंसह प्रथम, तर शिंदेसेनेने २,०८७ बीएलएंसह द्वितीय स्थान मिळवले आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसने १,३६५, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने १,२३५ बीएलए नियुक्त केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे २७२ बीएलए आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, बसपा, आम आदमी पक्ष आणि डाव्या पक्षांची उपस्थिती या आकडेवारीत दिसून आलेली नाही.
महायुती-मविआ दोघांचाही बूथवर भर…
राजकीय जाणकारांच्या मते, निवडणूक जिंकण्यासाठी बूथ व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. त्यानुसार महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना यांनी स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणात बीएलए नियुक्त केले आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धवसेनेनेही बूथनिहाय स्वतंत्र यंत्रणा उभारल्याने महाविकास आघाडीही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे चित्र आहे.
मेहकर अव्वल, चिखली सर्वात मागे…
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये मेहकर येथे सर्वाधिक १,३३४ बीएलए नियुक्त झाले आहेत. त्यानंतर सिंदखेड राजा (१,०२७) आणि मलकापूर (१,००१) या मतदारसंघांचा क्रमांक लागतो. तर चिखली मतदारसंघात केवळ ८८८ बीएलए नियुक्त झाल्याने तो जिल्ह्यातील सर्वात कमी बीएलए असलेला मतदारसंघ ठरला आहे.
दरम्यान, एसआयआर मोहिमेदरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी मतदार याद्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून, संबंधित यंत्रणांकडून त्यांची पडताळणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सिंदखेडराजात जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा…
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी सोमवारी सिंदखेडराजा तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजित बांगर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि क्षेत्रीय कामकाजाची सविस्तर पाहणी करून सर्व प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक प्रशासकीय उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीला नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे, गटशिक्षणाधिकारी स्वप्नील निकम तसेच निवडणूक शाखा, महसूल विभाग आणि संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.













