Advertisement Advertisement

डोणगाव पोलिसांची वाहनव्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर; रस्त्यात बंद पडले जीप, ट्रॅक्टरने ओढत आणावी लागली…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): डोणगाव पोलीस ठाण्याच्या वाहन व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मोहन खुर्द येथे तपासासाठी गेलेल्या पोलिसांचे शासकीय वाहन रस्त्यातच बंद पडल्याने अखेर ट्रॅक्टरच्या साहाय्याने टोचन करून ते पोलीस ठाण्यात आणावे लागले. ही घटना ११ जुलै रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली असून, यामुळे पोलिसांच्या वाहन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपास अधिकारी व कर्मचारी मोहन खुर्द येथे शासकीय वाहनाने गेले होते. मात्र, परत येत असताना वाहनाने अचानक साथ सोडली. बराच प्रयत्न करूनही वाहन सुरू न झाल्याने अखेर गावातील ट्रॅक्टरची मदत घेऊन वाहन टोचन करून पोलीस ठाण्यात आणण्याची वेळ पोलिसांवर आली.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या वाहनांची अशी अवस्था पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गुन्हेगारांचा पाठलाग, आपत्कालीन परिस्थिती किंवा नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने घटनास्थळी पोहोचण्याची वेळ आली असती, तर अशा परिस्थितीत काय झाले असते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांना सक्षम व सुस्थितीतील वाहने उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या दाव्यांवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधुनिक साधनसामग्री आणि विश्वासार्ह वाहनांशिवाय प्रभावी पोलीस व्यवस्था उभी राहू शकत नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या घटनेची शासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन डोणगाव पोलीस ठाण्यासह ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांना तातडीने नवीन व सक्षम शासकीय वाहने उपलब्ध करून द्यावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!