मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): “रोडच्या मधून का चालत आहेस?” या क्षुल्लक कारणावरून एका २६ वर्षीय युवकाला लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अनुराग अनंतराव पाटील (वय २६, रा. दुर्गा नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते मातकाम चौकातून पायी जात असताना सौरभ खिरोडकर (रा. शिवाजी नगर), लवप्रीत मेहेर (रा. वडोदा) आणि गणेश वराडे (रा. ओंकार नगर, मलकापूर) यांनी त्यांना अडवून “तू रोडच्या मधून का चालत आहेस?” असा जाब विचारत वाद घातला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपी सौरभ खिरोडकर याने हातातील लोखंडी फायटरने अनुराग पाटील यांच्या गालावर वार करून त्यांना जखमी केले. तर लवप्रीत मेहेर व गणेश वराडे यांनी लोटापोटी करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर आरोपींनी “तुला एखाद्या दिवशी जीवे मारून टाकू,” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या झटापटीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील चांदीची चैन आणि खिशातील २ हजार २०० रुपये हरवल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले असून, शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सौरभ खिरोडकर, लवप्रीत मेहेर आणि गणेश वराडे यांच्याविरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे करीत आहेत.













