मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील उमाळी गावात घराच्या अंगणात कुटुंबासह झोपलेल्या १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गावातीलच ६५ वर्षीय व्यक्तीने तरुणीच्या खाटेजवळ जाऊन तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप असून, या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या कुटुंबीयांसह घराच्या पटांगणात झोपली होती. याचवेळी आरोपीने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तिच्या खाटेजवळ प्रवेश केला. त्याने तरुणीचे तोंड दाबून तिच्याशी अश्लील चाळे केले तसेच तिचा पोशाख फाडून विनयभंग केल्याचा आरोप आहे.
घटनेदरम्यान तरुणीला जाग आली. तिने मोठ्याने आरडाओरडा करताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेतल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला.
पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात ६५ वर्षीय आरोपीविरुद्ध विनयभंगासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.












