Advertisement Advertisement

आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची भाविकांना मोठी भेट; खामगाव, शेगाव, नागपूर, अमरावती, भुसावळहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर आणि भुसावळ-पंढरपूर या मार्गांवर प्रत्येकी चार फेऱ्यांच्या विशेष गाड्या चालविण्यात येणार असून विदर्भातील भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

नागपूर-मिरज विशेष (गाडी क्र. ०१२०५/०१२०६) २३, २४, २५ जुलै रोजी नियोजित वेळेनुसार धावणार असून या गाडीला शेगाव, मलकापूर, भुसावळ, पंढरपूरसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

नवी अमरावती-पंढरपूर विशेष (गाडी क्र. ०१११९/०११२०) २१, २२, २४ आणि २५ जुलै रोजी धावणार आहे. या गाडीचे थांबे बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड, कुर्दुवाडीसह इतर स्थानकांवर असतील.

खामगावहून थेट पंढरपूरसाठी विशेष रेल्वे….

भाविकांसाठी सर्वात महत्त्वाची ठरणारी खामगाव-पंढरपूर विशेष (गाडी क्र. ०११२१/०११२२) २१, २२, २३ व २४ जुलै रोजी चार फेऱ्यांमध्ये धावणार आहे. खामगावहून सकाळी ११.३० वाजता सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात पंढरपूरहून सकाळी ५.०० वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता खामगाव येथे पोहोचेल.

भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीही धावणार….

भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष (गाडी क्र. ०११५९/०११६०) २४ ते २६ जुलैदरम्यान चार फेऱ्या करणार आहे. या गाडीमध्ये १६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असल्याने सर्वसामान्य वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या सर्व विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणी, शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी तसेच सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!