मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील उमाळी गावात घराच्या पटांगणात कुटुंबासह झोपलेल्या १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात ६५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी मध्यरात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या कुटुंबीयांसह घराच्या समोरील पटांगणात झोपलेली होती. याचवेळी उमाळी येथील गजानन सहादू रोठे (वय ६५) हा तेथे आला. सर्वजण झोपेत असल्याचा फायदा घेत त्याने तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर तरुणीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे उमाळी परिसरात संताप व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.













