चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरात मंगळवारी अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अचानक धडक तपासणी मोहीम राबविल्याने व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडाली. बुलढाणा येथून आलेल्या अधिकाऱ्यांनी शहरातील काही प्रमुख स्वीट मार्ट व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची पाहणी करून दूध, खवा, पनीर, दही, पेढे तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच अन्नभेसळीला आळा घालण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संकलित करण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागात नवीन नेतृत्व आल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही तपासणी मोहीम राबविण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. अचानक झालेल्या तपासणीमुळे अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या कारवाईबाबत अधिकृत माहिती मिळविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वृत्त लिहिपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नेमकी किती आस्थापनांची तपासणी झाली, किती नमुने घेण्यात आले किंवा कोणावर कारवाई करण्यात आली आहे का, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
चिखली शहरात गेल्या काही वर्षांत स्वीट मार्ट व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. अशा परिस्थितीत दूध, खवा, पनीर, दही व पेढे यांसारख्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये वेळोवेळी चर्चा होत असते. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा पदार्थांची नियमित तपासणी आवश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच नमुन्यांची गुणवत्ता आणि वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याने व्यापारी, ग्राहक व नागरिकांचे लक्ष आता या तपासणीच्या अहवालाकडे लागले आहे.















