Advertisement Advertisement

“आई-बाप समजतात पोरं शिकायला गेलीत… अन् चिखली बसस्थानकावर तासन्‌तास खेळतात ‘फ्री फायर’चा मोबाईलमध्ये खेळ!”

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल गेमचे वाढते व्यसन चिंतेचा विषय बनत असून, चिखली येथील मुख्य बसस्थानक हे विद्यार्थ्यांसाठी ‘फ्री फायर’सारखे ऑनलाइन हिंसक गेम खेळण्याचे अड्डे बनत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी बसस्थानकावर तासन्‌तास मोबाइलमध्ये गुंग असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळत आहे.

बसस्थानकावरील बाकड्यांवर रांगेत बसलेले विद्यार्थी हातात मोबाइल घेऊन गेम खेळण्यात इतके रममाण होतात की, आजूबाजूच्या जगाचाही त्यांना विसर पडतो. शाळा किंवा महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्याऐवजी अनेक विद्यार्थी बसची वाट पाहण्याच्या नावाखाली तासन्‌तास ऑनलाइन गेम खेळत बसतात.

ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे म्हणून आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांना शहरात पाठवतात. शहरातील पालकही अभ्यासासाठी आणि संपर्कात राहण्यासाठी मुलांना महागडे स्मार्टफोन उपलब्ध करून देतात. मात्र, या मोबाइलचा वापर नेमका कशासाठी होतो, याकडे अनेक पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अभ्यास किंवा ऑनलाइन क्लासचे कारण सांगून अनेक विद्यार्थी हिंसक गेमच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

पालकांनी वेळीच जागे होण्याची गरज….

तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांच्या वाढत्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे, मोबाइलचा वापर नियमित तपासणे आणि त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा या व्यसनाचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम….

मोबाइल गेमच्या वाढत्या व्यसनामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव, चिडचिड, एकलकोंडेपणा, डोळ्यांचे विकार आणि मानसिक तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि परीक्षेतील कामगिरीवर होत असून, पालक, शिक्षक आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!