बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल ६ जण बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये तीन तरुणी, एक महिला तसेच दोन लहान मुलांचा समावेश असून या घटनांमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
खामगावातून महिला व दोन चिमुकले बेपत्ता….
खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतून २७ मे रोजी २६ वर्षीय महिला, तिचा ७ वर्षीय मुलगा आणि ३ वर्षीय मुलगी हे राहत्या घरातून बेपत्ता झाले. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तिघांचाही अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सैलानी दर्गा परिसरातून तरुणी गायब….
रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सैलानी दर्गा परिसरात २८ मे रोजी २० वर्षीय तरुणी वडिलांसोबत दर्शनासाठी आली होती. मात्र दर्गा परिसरातून ती अचानक बेपत्ता झाली. परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नसल्याने रायपूर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
“कॉलेजला जाते” म्हणाली अन् परतलीच नाही…
बीबी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील २१ वर्षीय तरुणी २८ मे रोजी सकाळी सुलतानपूर येथे कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती वेळेत घरी परतली नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, पण तिचा काहीच मागमूस लागला नाही. याप्रकरणी बीबी पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
घरातून निघाली अन् बेपत्ता….
हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील १८ वर्षीय तरुणी २८ मे रोजी सायंकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी शोधाशोध केली, मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.












