देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील मेव्हणा राजा येथे अत्यंत हळहळजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या निधनाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने ७२ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत वृद्धाचे नाव तुकाराम महादू कदम (वय ७२, रा. मेव्हणा राजा) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी कचराबाई कदम यांचे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. पत्नीच्या जाण्याने तुकाराम कदम हे मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. गुरुवारी पहाटे घरासमोरील अंगणात त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तुकाराम कदम यांच्याकडे अत्यल्प शेती असून त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली आणि आप्तपरिवार असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मेव्हणा राजा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











