चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सहकार आणि राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान सभापती डॉ. संतोष वानखडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून बाजार समितीचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता कायम असली तरी नव्या सभापतीपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. माजी सभापती विष्णू पाटील कुळसुंदर यांच्या पत्नी कमल कुळसुंदर, समाधान सुपेकर, समाधान परिहार, पांडुरंग भुतेकर तसेच राम जाधव यांची नावे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. इच्छुकांनी संचालक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवत आपापली बाजू मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्याकडे असल्याने सभापतीपद काँग्रेसशी संबंधित सदस्यालाच मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शब्दावरच होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीवेळी आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रा. नरेंद्र खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने प्रभावी संघटनशक्तीच्या जोरावर बाजार समितीवरील सत्ता कायम राखण्यात यश मिळविले होते.
निवडणुकीनंतर पहिल्यांदा सभापतीपदाची निवड होत असताना तुलनेने कमी रस्सीखेच होती आणि डॉ. संतोष वानखडे यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र यावेळी इच्छुकांची संख्या अधिक असून सर्वच दावेदार तोलामोलाचे असल्याने पक्ष नेतृत्वासमोर मोठी कसरत उभी राहणार असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापतीपद अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. जिल्हा परिषद राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा असलेले काही चेहरेही या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक समीकरणांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
एकूणच, चिखली बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड ही केवळ पदाची निवड न राहता आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.















