मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घरात एकटी असलेल्या विवाहितेचा चुलत दिराने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात विवाहितेच्या सासूला मारहाण करण्यात आली असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २७ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिचे पती व मुलगा घरी नसताना चुलत दीर विजय शंकर गीते हा वाईट उद्देशाने घरात आला. त्याने महिलेचा हात धरून अंगावर पडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सासूने त्याला हटकले असता आरोपीने सासूच्या गालात मारहाण केली.
तसेच आरोपीने विवाहितेला घराबाहेर ओढत गल्लीत आणले. यावेळी झालेल्या गोंधळात आरोपीच्या नातेवाईकांनीही विवाहितेसह तिच्या सासूला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. भांडणादरम्यान विवाहितेच्या गळ्यातील पोतही तुटल्याचे सांगण्यात आले असून, आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात विजय शंकर गीते, अजय विजय गीते, मंगला कारभारी आंधळे व शंकर काशीराम गीते (रा. पिंपरी आंधळे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मारोती कायंदे पुढील तपास करीत आहेत.













