साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : साखरखेर्डा येथील वीज वितरण कंपनीत कामगार म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा विद्युत पोलवर काम करताना विजेचा जबरदस्त धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ मे रोजी पिंपळगाव सोनारा शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत कर्मचाऱ्याचे नाव बद्रीनाथ लक्ष्मण लंबे (वय ३५, रा. शिंदी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ लंबे हे सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान पिंपळगाव सोनारा येथील मारोती आश्रू वायाळ यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मरजवळील वीजवाहक पोलवर दुरुस्तीचे काम करीत होते.
काम सुरू असतानाच अचानक त्यांचा वीजवाहक तारेस स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जबरदस्त विद्युत धक्का बसून ते पोलवरून खाली कोसळले. घटनेनंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना उपचारासाठी प्रथम साखरखेर्डा येथील डॉ. विशाल मगर यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चिखली येथे हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.













