Advertisement Advertisement

मेहकरात चोरट्यांचा धुमाकूळ : पोलिसांवर लोखंडी रॉडने हल्ला; २४ तासांत आरोपी जेरबंद…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : मेहकर शहरातील रामनगरजवळील डी.पी. रोडवरील लक्ष्मीनारायण नगर भागात शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात मेहकर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी दोन घरांचे कुलूप तोडून तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न सुरू असतानाच नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांवर हल्ला करून आरोपी पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना जेरबंद करत चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी परिसरातील दोन घरांचे कुलूप तोडले होते आणि तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न सुरू होता. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन घटनास्थळी दाखल झाले. या वाहनात पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण गवई आणि चालक पोलीस कर्मचारी शिवाजी चिम हे तैनात होते.

पोलिसांचे वाहन वसाहतीत पोहोचताच एक संशयित चोरटा खाली उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच तो इमारतीच्या पायऱ्या चढून वरच्या मजल्याकडे पळाला. त्याचा पाठलाग करत गवई आणि चिम हे दोघे वर जात असतानाच वरून त्याचे इतर दोन साथीदार खाली आले आणि त्यांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला.

या झटापटीदरम्यान चोरट्यांनी हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण गवई यांच्यावर लोखंडी रॉडने सपासप तीन वार केले. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली असून तीन टाके पडले आहेत. तसेच डोक्यालाही जबर मार लागला आहे. चालक शिवाजी चिम यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत हाताने वार अडवला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

हल्ल्यानंतर चोरट्यांनी परिसरातील एका नागरिकाची हिरो पॅशन मोटारसायकल चोरून पलायन केले. मात्र, घाईगडबडीत ते स्वतः घेऊन आलेली दुचाकी घटनास्थळीच सोडून गेले. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.

या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी दीपक लिंगाळे आणि अजितसिंग टाक यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीतील तीन तोळे चांदीचे दागिने, हिरो पॅशन मोटारसायकलसह सुमारे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!