खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कॅनमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून काही युवकांनी थेट तलवार व कोयता हातात घेत पेट्रोलपंपावर दहशत माजवत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना खामगाव-अकोला रोडवरील के. के. पेट्रोलपंपावर २१ मेच्या रात्री घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ मेच्या रात्री अमोल जाधव व त्याच्यासोबत एक अनोळखी युवक के. के. पेट्रोलपंपावर आले होते. त्यांनी कॅनमध्ये पेट्रोलची मागणी केली. मात्र पेट्रोलचा साठा मर्यादित असून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी राखीव असल्याने कॅनमध्ये पेट्रोल देता येणार नाही, असे पेट्रोलपंप व्यवस्थापक सागर अवचार यांनी सांगितले.
याच कारणावरून आरोपी संतापले व त्यांनी सुरुवातीला शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर अमोल जाधव, अक्षय जाधव, चेतन जाधव आणि आणखी एक अनोळखी इसम, सर्व रा. हिंगणा कारेगाव, यांनी हातात तलवार व कोयते घेऊन पेट्रोलपंपावर दहशत निर्माण केली. आरोपींनी कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पेट्रोलपंप व्यवस्थापक सागर अवचार यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरुद्ध आर्म अॅक्ट कलम ४/२५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किरण राऊत करीत आहेत.














