धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : धाड-मौंढाळा मार्गावरील सहकार विद्या मंदिर परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात ३९ वर्षीय तरुण शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुधाचे संकलन करून जाणाऱ्या बोलेरो पिकअप आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला.
मृत शिक्षकाचे नाव विष्णू उर्फ विनोद काळे (वय ३९, रा. मौंढाळा) असे असून, ते शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मौंढाळा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ४८-एजी-२८९५ ही बेलोरा (जि. जालना) येथून दूध संकलन करून अमर दूध डेअरीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी धाडहून मौंढाळाकडे जाणारी दुचाकी क्रमांक एमएच २८-एजी ५५१४ सहकार विद्या मंदिराजवळ आली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली.
या धडकेत दुचाकीस्वार विष्णू काळे हे हवेत उडून रस्त्यावर आदळले. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच हात व पायांनाही गंभीर मार लागल्याने उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने धाड पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी बोलेरो चालकाविरुद्ध धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.













