देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरापासून काही अंतरावर जिल्ह्यातील सर्वात मोठा संत चोखासागर (खडकपूर्णा) प्रकल्प असतानाही देऊळगाव राजा शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तब्बल १५ ते २० दिवसांच्या अंतराने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अखेर संतप्त नागरिकांनी आज, मंगळवार दि. १९ मे रोजी नगरपालिकेवर विराट हंडा मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
सकाळी १०:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरातील महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोक्यावर रिकामे हंडे घेत महिलांनी “धरण उशाशी, कोरड घशाशी”, “पाणी आमचा हक्क आहे” अशा जोरदार घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
मोर्चा नगरपालिकेवर धडकताच वातावरण अधिकच तापले. सत्ताधारी प्रतिनिधी व प्रशासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा माधुरीताई शिपणे आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना निवेदन देण्यात आले. पुढील दोन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
दरम्यान, शहरातील जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक मूलभूत उपकरणांची कमतरता असून विद्यमान यंत्रणा क्षमतेपेक्षा कमी असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोर्चात मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते.













