बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – दारू आणून न दिल्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना बुलढाणा तालुक्यातील हतेडी खुर्द येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हतेडी खुर्द येथील रहिवासी समाधान पुंजाजी घायवट (वय ४४) हे काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत मिसिंगची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता ८ मे २०२६ रोजी मध्यरात्री समाधान घायवट आणि त्यांचा २१ वर्षीय मुलगा अनिकेत घायवट यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली.
तपासात उघड झाल्यानुसार, समाधान घायवट यांनी एका पार्टीमध्ये मद्यप्राशन केले होते. रात्री उशिरा त्यांनी मुलगा अनिकेत याला आणखी दारू आणण्यास सांगितले. मात्र, मध्यरात्री दारू आणण्यास अनिकेतने नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापलेल्या समाधान घायवट यांनी हातात काठी घेत मुलाच्या अंगावर धाव घेतली. यावेळी संतापाच्या भरात अनिकेतने वडिलांच्या गुप्तांगावर जोरदार लाथ मारली. गंभीर मार लागल्याने समाधान घायवट यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर घाबरलेल्या अनिकेतने पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांचा मृतदेह रात्रीच शेतात नेला. हतेडी खुर्द शिवारातील सरपणाच्या ढिगाऱ्यात मृतदेह टाकून त्याने पेटवून दिला. मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाल्यानंतर आरोपीने वडील घरातून कुठेतरी निघून गेल्याची खोटी माहिती नातेवाईक आणि गावकऱ्यांना दिली. एवढेच नव्हे तर पोलिसांतही वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मिसिंग प्रकरणाचा तपास करत असताना तपास अधिकारी गजानन काकडे यांना अनिकेतच्या हालचाली आणि बोलण्यावर संशय आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी सुरू केली. कसून चौकशीदरम्यान अनिकेत घायवट याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी १७ मे २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, २३८, २३९ आणि २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी हे करीत आहेत. एका बेपत्ता व्यक्तीच्या तपासातून पोटच्या मुलानेच वडिलांचा खून करून मृतदेह जाळल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.













