बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेचा बस वाहकाकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ९ मे रोजी मोताळा बसस्थानक परिसरात घडली असून, याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी संबंधित बस वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने १५ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील पीडित महिला ९ मे रोजी मलकापूरहून वैजापूरकडे प्रवासासाठी निघाल्या होत्या. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास मोताळा बसस्टॉप येथे बस थांबली असता वैजापूर आगारातील बस वाहकाने महिलेसोबत अंगलट करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. “धक्का मारू नका, व्यवस्थित बसा,” असे महिला म्हणाल्यानंतरही संबंधित वाहकाने वारंवार धक्के देत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महिला जागेवरून उठू लागल्यावर “धक्काबुक्की लागतच असते,” असे म्हणत वाहकाने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला. तसेच नंतर संबंधित वाहकाने महिलेच्या मोबाईलवर कॉल करून “तुझा व्हिडिओ काढलेला आहे,” अशी धमकी देत संभाजीनगर येथे बोलावल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेका अमोल खराडे करीत आहेत.












